Tuesday, January 19, 2016

शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा आणि काही विचार

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मुद्दा तसा नवीन नाही. नव्वदच्या दशकात हा मुद्दा प्रकाशात आला आणि त्यानंतर माध्यमांच्या व राजकारण्यांच्या अजेंड्यावर राहिला आहे. तरीही तो सुटलेला आहे असे दिसत नाही. असे का?
ह्या प्रश्नावर मला काम करण्याची संधी माझ्या सामाजिक क्षेत्रातील कामामुळे मला मिळाली. त्यामुळे मला ह्या विषयाबद्दल विचारही करता आला. हे विचार लिखीत स्वरूपात मांडणे व इतरांबरोबर शेअर करणे महत्वाचे वाटले म्हणून हा ब्लॉग प्रपंच.
सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की सर्वसाधारण शेतकरी हा काही सर्व मानवी भाव भावना व विचारांचे कल्लोळ ह्यांना नियंत्रणामध्ये ठेवू शकणारा स्थितप्रज्ञ योगी नाही. तो ही मर्त्य मानव आहे. आत्महत्या करणारी माणसे अती ताणतणावांखाली जगत असतात आणि ते सहन करण्याची क्षमता जेंव्हा संपते तेंव्हा हे जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे ही मानसिक प्रक्रीया शेतकऱ्यामध्ये आणि शहरी माणसामध्ये काही वेगळी नसते. मग ग्रामीण शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शहरी लोकांच्या आत्महत्या ह्यामध्ये फरक जो आहे तो फक्त सांस्कृतिक आणि भौगोलिक ठरतो जो त्यांच्या जीवनामध्ये आणि जीवनशैलीमध्येही आहे.
त्यामुळेच माझ्या मते शेतकरी आत्महत्या हा शेतीक्षेत्रातील आणि त्याच्याशी निगडीत व्यक्तिंच्या जीवनातील विविध समस्यांचा एक महत्वाचा निदर्शक आहे. महाराष्ट्रातील अर्धी लोकसंख्या आजही ग्रामीण भागात राहत असल्यामुळे आणि ह्या प्रश्नाचे महत्व अनन्यसाधारण आहे. तुलनात्मक दृष्ट्या शेतकऱ्यांच्या अधिक प्रमाणात होणाऱ्या आत्महत्या ही जरी चिंतेची बाब असली तरी आत्महत्या झाल्यानंतर त्यावर माध्यमांवर केली जाणारी ओरड आणि लोकप्रतिनिधी व विविध खाजगी संस्थांनी त्यावर केलेली मदत ही जखमेवरची वरवरची तात्पुरती मलमपट्टी ठरते आहे. त्यामुळेच २५ वर्षे उलटून गेली तरी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या सरकारी तसेच खाजगी मदतीचा खुप मोठा ओघ येऊन सुध्दा थांबलेला दिसत नाहीत. उलट आता मराठवाडा आणि पुर्व विदर्भातून होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
ग्रामीण भागामध्ये आत्महत्यांच्या अनुषंगाने जाणारी मदत मुख्यत्वेकरून दोन प्रकारची दिसते. पहिली अतिशय सरधोपटपणे केली जाणारी मदत म्हणजे ज्या कुटूंबात आत्महत्या झाली आहे त्या कुटूंबाला थेट अर्थसहाय्य करणे. दुसऱ्या प्रकारची मदत म्हणजे आत्महत्या काही विशिष्ट कारणांमुळे झाल्या असा निष्कर्ष काढून ती कारणे दूर करण्यासाठी केली गेलेली मदत. कर्जमाफी, कृषिसुधार प्रकल्प, सिंचन प्रकल्प, बचत गट असे विविध मार्ग वापरून ही मदत शासकीय व खाजगी संस्था करत आहेत. दोन्ही प्रकारची मदत पोच करणाऱ्या संस्थांची सचोटी, कार्यक्षमता तसेच त्यांच्या मदत कार्यक्रमांची परिस्थितीशी अनुरूपता ह्यांच्या प्रमाणात त्या योजनांनी निश्चित केलेले यश तसेच अपयश त्यांना मिळत आहे.
माझे आतापर्यंतचे ह्या कार्यक्रमांचे निरीक्षण मात्र मला सांगते की आत्महत्या थांबविण्यात या कार्यक्रमांची परीणामकारकता फारच मर्यादीत आहे. आत्महत्या केलेल्या कुटूंबांना थेट आर्थिक मदत करण्यामुळे आत्महत्या थांबणार नक्की नाहीत आणि तो अश्या प्रकारच्या मदत कार्यक्रमांचा उद्देशही नाही. असे असले तरी त्याची त्वरीत गरजही असतेच. दुसऱ्या प्रकारच्या दूरलक्ष्यी कार्यक्रमांमध्ये मात्र एक मोठी त्रुटी मला जाणवते ती म्हणजे आत्महत्या करणाऱ्या किंवा करू शकेल अश्या समाजाच्या सहज बळी पडणाऱ्या नेमक्या घटकाला निश्चित करून त्यावर ह्या कार्यक्रमांमध्ये लक्ष्य केंद्रीत करण्यात येत नाही. तसेच जेंव्हा मदत कार्यक्रमांची उद्दिष्टे ठरविण्यात येतात तेंव्हा आत्महत्या आणि त्याच्याशी निगडीत मानसिक व सामाजिक घटकांना मुद्दा न बनविता शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती, रोजगारामध्ये वाढ असे मुद्दे ठरवण्यात येतात. अप्रत्यक्षपणे हे कार्यक्रम शेतकरी आत्महत्या थांबवतील असा एक भाबडा किंवा भित्रा समज ह्या कार्यक्रमांमध्ये दिसतो. मी भित्रा अश्यासाठी म्हणेन कारण ह्या कार्यक्रमांमुळे शेतकरी आत्महत्या थांबतील असा आत्मविश्वास बऱ्याचवेळा मुळातच नसतो त्यामुळे थेट तशी उद्दीष्टे ठेवण्याचे हेतूपुरस्सर टाळले जाते. जसे वाघाला वाघ म्हटले किंवा वाघोबा म्हटले तरी तो खाणारच असतो तसे हा विषय थेट अजेंड्यावर घेऊन त्याला सामोरे गेले तरच त्यावर काही ठोस उपाय सापडतील आणि त्यासाठी त्या बळी पडू शकणाऱ्या कमजोर घटकापर्यंत पोचले पाहीजे. परीघावर राहून उपाय योजना करून चालणार नाही.
मला दुसरे असे वाटते की शेतकऱ्यांच्या जीवनातील ताणतणाव, असूरक्षितता, नैराश्य, हतबलता या प्रश्नांना निव्वळ आर्थिक उत्तरे असू शकत नाहीत त्यामुळे शेतकरी आत्महत्या प्रश्नाची उत्तरे फक्त आर्थिक स्वरूपाची नसून त्याच्या मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचीही आहेत. असे उपाय सध्याच्या शासकीय काय किंवा खाजगी संस्थांच्या अजेंड्यावर दिसत नाहीत. कदाचित थेट मोजमाप होतील असे दृश्य परीणाम ह्या उपायांचे नसतील म्हणूनही हे टाळले जात असेल. परंतु ही उत्तरे शोधली पाहीजेत आणि तसे उपचार केले पाहीजेत हे मात्र निश्चित.