Wednesday, November 4, 2015

खाद्यसंस्कृती- ज्याची त्याचीमी ह्या विषयावर बराच विचार खऱ्या अर्थाने केला तो घाना ह्या आफ्रीकेच्या पश्चिम भागातील देशात घालवलेल्या एका वर्षात. माझा त्या देशातील तो दुसरा दिवस मी कधीच विसरणार नाही. पहिला दिवस, मी आम्हाला ज्या हॉटेलमध्ये ठेवले होते, तिथे उपलब्ध असलेले नुडल्स, सॅलड सारखे ओळखीचे पदार्थ खाऊन काढला होता. पण त्या पहिल्या आठवड्यानंतर माझी रवानगी त्या देशाच्या एका मागास अंतर्भागात होणार होती आणि मला ओळखीचे असलेले सर्व खाद्यपदार्थ मला नक्कीच आयते उपलब्ध होणार नव्हते. हे सर्व अनोळखी पदार्थ खा किंवा उपाशी रहा असे दोन पर्यायच माझ्यासमोर असणार होते. आजचं मरण किती दिवस उद्यावर ढकलत राहणार असा विचार करत मी माझा मोर्चा स्थानिक आफ्रीकन पदार्थांकडे त्या दिवशी वळवला.
"तुला हे हवंय? नक्की हेच हवंय ना?" जेवणाच्या बुफे काऊंटरवरील वाढपी बाईने मला दोनदोनदा विचारत एका मोठ्या वाडग्यामध्ये फुफु नावाचा एक चिकट गोळा टाकला आणि त्यावर मटणयुक्त रस्सा ओतला. आजूबाजूच्या आफ्रीकन लोकांकडे मी पाहीलं. ते लोक त्यांच्या त्यांच्या वाडग्यांमधल्या मोठ्या गोळ्यांचे छोटे छोटे तुकडे काढून त्याचे गोल गोल गोळे करून आणि त्याच्यासोबत थोडासा रस्सा घेऊन गपकन गिळताना दिसत होते. मीही तसंच करण्याचा प्रयत्न केला. तो फुफुचा गोळा मला गिळताच येईना. तो तोंडातच चिकटून राहिल्यासारखा वाटत होता आणि त्या रश्श्याच्या विचित्र वासामुळे मला पोटातलं सगळं ढवळून वरती येईल असं वाटत होतं. माझ्या सर्व प्रतिक्षिप्त क्रीया दाबून टाकत मी जेवढं खाता येईल तेवढं खाल्लं आणि बाकी सर्व तसंच न खाता सोडलं.
माझ्या समोर बसलेली ब्रिटीश व्हॉलंटीयर चेरीथ तिच्या ताटातला पास्ता काट्याने टोचत मला म्हणाली, "सचिन, तू खूपच साहसी आहेस. दुसराच दिवस तुझा आफ्रीकेतला आणि तू स्वतःला चांगलंच जुळवून घेतलं आहेस. "तिला काय माहिती, मी काय काय सहन केलंय ते खाताना. माझी अजूनही घरी ताटात वाढलेलं अर्धवट टाकायची हिम्मत नाही. आई बाबांचे संस्कारच तसे आहेत आणि म्हणे बराच साहसी आहेस." मी मनातच म्हणालो.
रात्री बेडवर पडल्या पडल्या मी परत ह्या प्रसंगाचा विचार करू लागलो तेंव्हा मला असं लक्षात आलं की मी खाल्लेल्ला तो पदार्थ ज्या सामग्रीपासून बनवला होता ती सर्व सामग्री भारतीय जेवणातही वापरली जाते. हे जाणवून मला हसूच फुटलं. फुफु ज्या कसावा पासून बनवतात त्याच कंदापासून आपल्याकडे साबूदाणा बनवला जातो. बकऱ्याचे मटण आपल्याकडेही असते. पामतेल, टोमॅटो, कांदा, आलं, लाल तिखट ह्या सर्वांचा वापर आपल्या जेवणातही अगदीचा नेहमीच आहे. फक्त ह्या सर्वांचे एकत्रित असणं आणि त्यांवर केली गेलेली प्रक्रीया पूर्णतः वेगळी होती.
त्याकडे पहाण्याचा दृष्टीकोनही वेगवेगळा आहे. वाढपीण बाई मी ह्या सगळ्याला नवखा आहे हे जाणवूनही बिनदीक्कत अन्य आफ्रीकन माणसांसारखं भरपूर वाढत होती. आमच्या देशात नवख्या परदेशी माणसाच्या बाबतीत हेच समोरच्या माणसाचा अंदाज घेत त्याला विचारत अतिशय बिचकत आणि कोचत वाढतात. मी अर्ध्यापेक्षा जास्त अन्न वाडग्यात तसंच सोडलं होतं तरी वेटर निर्विकारपणे उचलून घेऊन जात होता आणि समोरची ब्रिटीश स्त्री माझं चक्क कौतूक करत होती. माझ्या देशात घरचे तर सोडाच हॉटेलमधला वेटरही ह्याबद्दल किमान एक दटावणीयुक्त किंवा निराशायुक्त दृष्टीक्षेप न देता पुढे गेला नसता.
जसजसे माझे तिकडचे दिवस पुढे जाऊ लागले तसे ह्या सर्व खाद्यसंस्कृतीचे विविध रंग अनुभवास येऊ लागले. जर तुम्ही तुमच्या ताटामधले सर्व व्यवस्थित साफ केले तर लोक तुमच्याकडे विचित्र दृष्टिने पाहतात हे लक्षात आले. त्यांची अपेक्षा असते की तुम्ही थोडे तरी अन्न ताटात सोडून दिले पाहीजे अन्य प्राणी पक्षी, भूतंखेतं किंवा कधीकधी दारावरचे भुकेले भिकारी ह्यांच्यासाठीही. जेवण सुरू करताना भारतीयांप्रमाणेच या जेवायला असं आजूबाजूच्या आगंतूकांना म्हणण्याची सवय असली तरी प्रत्यक्षात कोणी जेवण देत नाहीत हेही समजलं. त्याच्या विरूध्द तुम्ही रस्त्यात प्रवासात काही खात असाल तर कोणीही ओळखपाळख नसलेली माणसं तुमच्याकडे खायला मागायला आणि दिलं तर घ्यायला लाजत नाहीत. गप्पा मारत जेवण्याची सवय असलेल्या आपल्याला, आपलेच आयुर्वेदातील प्राचीन नियम आफ्रीकन माणसं त्याबद्दल काही माहीत नसताना, पाळताना दिसतात. म्हणजेच ते लोक खाताना पाणी पित नाहीत आणि बोलत तर अजिबात नाहीत.
हे जसं खाण्याच्या नियमांबद्दल तसं प्रत्यक्ष खाण्याच्या बाबतीतही पदोपदी फरक जाणवत असत. आपले भारतीय पदार्थ म्हणजे चावण्याचा व्यवस्थित व्यायाम तर त्यांचे पदार्थ म्हणजे आधीच इतके उकडून, कांडून मऊ केलेले की नुसते गपगप गिळले की झालं. अर्थात अपवाद फक्त मांसखंडांचा. जणू दात फक्त तेवढ्यासाठी राखूण ठेवलेले. भारतीयांना विविध चवी वेगळ्या राखण्याचा आणि अधिकाधिक तीव्र बनवण्याचा सोस तर त्यामानाने आफ्रीकन जेवणात कुठेच अश्या तीव्र चवी नसत. त्यामुळे आपले लोणचे त्यांना विस्फोटक वाटत असे तर दाताखाली येणारे जिरे, मोहरी, खोबरे म्हणजे कचकच वाटत असे.
असेच मोठाले फरक कुठले पदार्थ अधिक प्रतिष्ठेचे त्याबद्दल. आपल्याकडे पामतेल हे रेशनवर मिळणारे अल्प आर्थिक उत्पन्न वाल्यांचे तर शेंगदाणा तेल अधिक श्रीमंतांचे. नेमके ह्याच्या उलटे घानाच्या उत्तर भागात मला अनुभवायला मिळाले. मी तेथील स्थानिक शेंगदाणा तेलाच्या शोधात एका तेलव्यापारी बाईच्या दुकानात गेलो तर त्या बाईने मला माझ्यासारख्या परदेशी माणसाने पाम तेल घेतलेले कसे चांगले त्याबद्दल महत्व पटवून दिले. तिकडे एक केमोल्गा नावाची लाल रंगाची ज्वारी मिळते. एक पीक म्हणून त्याची त्या भागात चांगली उत्पादकता असली तरी तरी तिकडच्या सांस्कृतिक मानकांनुसार तिला कनिष्ठ मानले जाते कारण त्याच्या शिजवलेल्या पीठाचे गोळे मऊ आणि चिकट बनत नाहीत.
मी एकदा त्या केमोल्गाची थालिपीठं बनवून माझ्या काही सहकारी आणि मित्रांना खाऊ घातली आणि चक्क त्यांना ती आवडली ह्याबद्दल आश्चर्यमिश्रीत आनंदही मला वाटला होता. मी परत भारतात आल्यानंतर एकदा तिथल्या एका सहकाऱ्याने चक्क मला थेट भारतात फोन करून सांगितले की मी घरी यायच्या आधीच तो प्रकार त्याने माझ्याकडून शिकून घ्यायला हवा होता. ह्या थालिपीठांप्रमाणेच मला अनेक पदार्थ कोकणी मराठी पध्दती आणि स्थानिक सामग्री वापरून करता आले होते. परदेशात गेल्यावर हे प्रयोग लोक स्वतःहुनच करतात असे अन्य अनेकजणांच्या अनुभवातून लक्षात येते. त्यामागे पिझ्झा बर्गर सारखे मार्केटींग नसते तर सांस्कृतिक संस्कार असतात आणि त्यांचे महत्व आपल्याला मूळ परिस्थितीपासून दूर गेल्यावर अधिक जाणवू लागते.
दोन विविध खंडांच्या खाद्यसंस्कृतींमधील टोकाचे फरक प्रत्यक्ष अनुभवून परतल्यानंतर भारतातील दोन राज्यांच्या खाद्यजीवनामध्ये फारच कमी फरक आहेत असे मला वाटायला लागले. अर्थात तरीही हे फरक आहेत आणि त्यांची म्हणूनच स्वतंत्र ओळख आहे हे ही मान्य करायलाच पाहीजे. ज्याची त्याची ओळख प्रत्येकाने निर्माण केलेली आहे किंबहुना प्रत्येकाला ती करायला लागेल हे जसं व्यक्तीच्या बाबतीत खरं आहे तसंच ते खाद्यसंस्कृतीलाही लागू होईल. मला प्रश्न नेहमी असा पडतो की आमच्या त्या ओळखीचं काय? त्याबद्दल अजुन असंच परत कधीतरी.