Sunday, September 15, 2013

देवा श्री गणेशा

“थॅंक गॉड, मी मुंबईच्या बाहेर आहे.” एखाद्या माझ्यासारख्या नास्तिकतेच्या जवळ जाणारे विचार असलेल्या माणसाच्या तोंडातून हे शब्द ऐकून माझ्या आजुबाजूच्या आस्तिकांना अत्यानंद झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे शब्द सहजच तोंडी येतात. हे सांस्कृतिक आहे, वैचारीक आणि मानसिक नाही.

हे माझ्या मनातले विचार माझा गणेशोत्सवादरम्यान काहीतरी दिवस जिथे गोंगाटापासून दूर राहताना होणारा आनंद दर्शवणारे आहेत. “मुंबई मुलतः मराठी माणसाची आहे आणि इथे मराठी भाषेलाच प्राधान्य मिळाले पाहीजे,” इ विचारांपासून मी दूर गेलो नसलो तरी ज्या पध्दतीने इथे आम मराठी जनता तिचे मराठीपण जपण्याचा प्रयत्न करत आहे त्याचे गणेशोत्सव हे उत्तम निदर्शक आहे. हे निदर्शक मला सांस्कृतिक अवनती होत असल्याचे जाणवून देत आहे.

दोन वर्षांपुर्वी एका प्रवास विषयक इंग्रजी वाहिनीवर एक अमेरीकन सूत्रधार मुंबईचा गणेशोत्सव सादर करत होता. त्याचे सुरूवातीचे वाक्य माझ्या कायमचे लक्षात राहीले आहे. तो म्हणाला होता, “ही मी बघितलेली जगातली सगळ्यात मोठी स्ट्रीट पार्टी आहे.” ज्या गोष्टी पाश्चात्य जगामध्ये एका बंद खोलीत आम जनतेला त्रास न होता केल्या जातात त्या येथे धर्माच्या नावाखाली खुलेआम केल्या जातात. आमच्या सोसायटीच्या बाहेरून जाणारा रस्ता गणपती आणण्याचा आणि विसर्जना नेण्याचा मुख्य मार्ग आहे. गणपतीच्या मिरवणुकीवेळी रस्त्यावर असलेल्या दारूच्या दुकानाकडे आपोआपच नाचणाऱ्या तरूणांची पावले वळतात. तिथे गणपतीला अधिक वेळ थांबावे लागते. सोसायटीतील लोकांना त्यांची कर्णकर्कश्श हिडीस आणि अश्लील गाणी जवळजवळ दिवसभर ऐकावी लागतात. वाहतूकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून चुकीच्या बाजूने आपल्या गाड्या कश्याही हाणायचा परवाना मिळाल्यासारखे पादचाऱ्यांची पर्वा न करता हे गणेशोत्सव कार्यकर्ते बेदरकारपणे फिरतात.

ह्यांचे नेते अश्या कार्यकर्त्यांमधूनच आलेले आणि प्रामुख्याने त्यांचे नेतृत्व करणारे असतात. त्यामुळे सत्तेच्या सहाय्याने गणेशोत्सवाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक पैश्यांची व साधनांचा सहज दुरूपयोग ते करतात. रस्ते अडवणे, वीज चोरणे अशी कामे म्हणजे त्यांच्या डाव्या हातचा मळ. ह्या सर्वांना मदत करण्यासाठी शासकीय यंत्रणा त्यांच्या नियंत्रणाखाली असतातच. एवढे सगळे करून स्वतःच्या मोठमोठ्या गोंडस छब्या मध्यभागी आणि एका कोपऱ्यात टिळक आणि शिवाजीमहाराजांना ठेवून बरेचसे बेकायदेशीर फलक झळकवताना लाजही वाटत नाही.

दहा दिवसांची ही डिस्को पार्टी संपल्यानंतर आपल्याला काय मिळते, ध्वनी व वायू प्रदुषणाने त्रस्त शरीर व मन, रस्त्यावरचे कचऱ्याचे ढीग आणि समुद्राच्या ओहोटीसोबत वाहत येणारे गणेशमुर्तींच्या विविध भागांचे दुःखदायी दृश्य. असल्या गणेशोत्सवाचेच विसर्जन करणे चांगले आणि त्याबरोबर हीणकस मानसिकतेने गढूळ झालेल्या तथाकथित धार्मिकतेचे आणि सांस्कृतिकतेचेही.