Saturday, December 15, 2012

देवधर्म आणि घाण, कचरा

काही गोष्टींबद्दल जरा बिचकत, हळू आवाजात, कोणाला ऐकू येईल न येईलसे बोललेले चांगले असते. लिखाणातसुध्दा स्पष्टपणे रोखठोक न लिहीता आपला मुद्दा जरा आडूनच मांडलेला बरा असतो. अश्याच विचाराने चालण्याचे दिवस आहेत. सर्वमान्य आणि लोकप्रिय ते लिहा, वाचा आणि बोला अश्या टायपाचे वडिलकीचे सल्ले सहज फुकट मिळू शकतात आणि त्यासाठी घरातच कोणी मोठे असण्याची गरज नाही. पण जे जाता येता सहज दिसतं त्याच्या बद्दल खूल्या पध्दतीने लिहीले तर वाचायला कोणाचीच ना नसावी.

पार्ल्याच्या पुर्व भागात एक पिंपळेश्वर महादेव नावाचं देऊळ आहे. देवळाच्या जवळच दोन पिंपळाचे वृक्ष आहेत. त्यातल्या एका वृक्षाच्या बुंध्याशी अनेक देवाच्या जून्यापान्या तसबीरींची भाऊगर्दी आहे. गणपती, लक्ष्मी, सरस्वती, मारूती असे सर्व देवदेवता सुखेनैव एकमेकांच्या बाजूला बसलेले दिसतात. पण सर्व तसबिरींवर प्रचंड धूळ बसलेली आहे. त्या तसबिरींमध्येच अनेक प्लास्टीक पिशव्यांमध्ये निर्माल्यासारखे दिसणारे बरेच काही भरून ठेवून दिलेले आहे.

जुहू्च्या समूद्र किना-याजवळ एक निर्माल्य टाकण्यासाठी सार्वजनिक शौचालयाच्या जवळच एक मंगल कलश ठेवेलेला आहे. ते प्रचंड मोठे प्लास्टीकचे अगडबंब आकाराचे भांडे सहजपणे हलवता येण्यासारखे नाही. कचरा जमा करणा-या माणसांनाही त्यात उतरून त्यातील निर्माल्य नामक गोष्ट काढून साफ करणे सोपे नाही. भटके कुत्रे, उंदीर, घुशी मात्र त्यातल्या अर्धवट कुजलेल्या सेंद्रीय पदार्थांकडे आकर्षित होऊन त्यामध्ये मुक्त संचार करत असतात.

गणेशोत्सव, दुर्गापूजा, छट पुजा अश्या समस्त नदी, समुद्राशी संबंधित उत्सवांदरम्यान आणि त्याच्या नंतरही मी मुंबईतल्या कुठल्याही समुद्रकिना-यावर चुकूनसुध्दा जाण्याचे टाळतो. समुद्राच्या पाण्यातच काय वाळूतही सर्वत्र कच-याचे ढीग तर असतातच पण ज्या मुर्तींची लोक मनोभावे पूजा करत असतात त्या मूर्तींचे वेगवेगळे भागही इतस्तत: पसरलेले असतात. त्यातूनच पाय टाकत वाट काढावी लागते.

ऋषिकेष हे मी धार्मिक नसूनही खूप आवडलेले असे तीर्थस्थळ होते पण फक्त २००७ सालापर्यंतच. बरोबर पाच वर्षांनी २०१२ साली मी जेंव्हा तिथे परत गेलो तेंव्हा मला जिथे जागा मिळेल तिथे बांधलेली मंदीरे, हॉटेले आणि दुकाने असेच काही बाही दिसले. ह्या बांधकामांचा राडारोडा जागोजागी टाकलेला होता. तिथली गंगा आता पुर्वी सारखी मुक्तपणे वाहत नाही. तिला आता विविध तिथींनुसार, धार्मिक संस्थानांच्या मागणीनुसार टिहरीच्या धरणातून पाणी सोडले जाते. एका कुठल्या तरी धार्मिक संस्थेने तर (आता त्याचे नाव आठवत नाही) चक्क नदीच्या पात्रातच पक्के बांधकाम करून आपल्या दैनंदीन गंगा आरती कार्यक्रमाच्या प्रेक्षकांसाठी एक फलाट तयार केला आहे. नदीच्या खालच्या बाजूला ऋषिकेश गावाची नवी वस्ती आहे. ह्या वस्तिच्या घाटांवर अंत्यविधी चालतात. अतिशय कमी सुविधा व गलिच्छता असलेल्या ह्या वस्तीमध्ये डुकरे इतस्तत: फिरत असतात आणि घाटांच्या जवळचा किना-याचा भाग प्रातर्विधीसाठीसाठी वापरला जातो.

केर कचरा हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या घरातून तो काढून टाकला की स्वच्छ झाल्याचे समाधान होते. मूर्तीपूजेच्या प्रक्रीयेत अशीच मनाची स्वच्छताही होत असेल कदाचित. ह्या सर्व भक्तीच्या साधनांचे काम झाले की मग बहुसंख्य पूजकांना त्याची असलेली गरज संपते. मग सोयिस्कर काणाडोळा करत ती कुठेतरी पिंपळाखालच्या तसबीरींसारखी कुठेतरी सरकवून दिली की तात्पुरते काम भागते. मग रस्त्यावरच्या जाणा-या येणा-यांचे, पर्यावरणाचे काही झाले तरी चालते. “आजच्या क्षणाला घरात कोणत्या तरी देवाची मूर्ती बसवून मानसिक समाधान मिळाले आहे ते महत्वाचे, उद्याचे कोणी बघितले आहे?” असे वाटणा-या लोकांच्या भावनाही मग कचकड्याच्या, अल्पजीवी नाहीत का?

मग खरे कोणी बोलले तर असल्या कुचकामी भावनांना धक्का हा पोहोचणारच.

हे असले लिहील्याबद्दल, सोशल नेटवर्कींग वेबसाईटवरून शेअर केल्याबद्दल, त्याला लाईक केल्याबद्दल अटकही होऊ शकते. खबरदार, जमाना सत्याकडे सोयिस्कर काणाडोळा करणा-यांचा आहे.