Thursday, May 27, 2010

स्वान्त


त्याच्या आयुष्यात रोजच दिवस उगवत होते आणि मावळत होते. परिस्थितीने हतबल झालेल्या त्याने एकदा अखेर तो निर्णय घेतला. दोलायमान मनस्थितीमध्ये दररोज जगणे त्याला असह्य झाले होते. त्याने आपला निर्णय पक्का केला होता. "बस्स संपवायचं सगळं! दुस-याकडे मदतीसाठी हात पसरत याचकासारखं जगणं मला केवळ अमान्य.”
एक ओझे उतरवून भार हलका झाल्यासारखे त्याला वाटले. पण हेही सूख क्षणभंगूर ठरले होते. निर्णय घेतल्यानंतर त्याची जबाबदारीही आली होती. कसे, कुठे, केंव्हा आणि तत्सम प्रश्न सहजासहजी त्याची पाठ सोडणार नव्हते. "बस्स शेवटचंच! आता नाही चिंता करावी लागणार सारखी, अजून एकदाच आणि मग सगळं संपेलच.” त्याला हसू आले आपल्याच विचारांचे. “साली इथेही तीच, जगण्याची इच्छा लावणारी आशा, आपल्याला धरून ठेवतेय.”
तो पट्टीचा पोहणारा होता. समुद्राने त्याला एकेकाळी वेड लावले होते. तरूणाईत पदार्पण झाल्यानंतर समुद्र त्याला नेहमीच आकृष्ट करत असे. चहूबाजूने बंदीस्त असलेल्या तळ्यापेक्षा त्या असीम समुद्रात दूरवर जाण्यासाठी कित्येकजणांचे डोळे चूकवत जाणे त्याला आवडत असे. त्याने ठरवले, “आपला शेवट त्याच्यासोबतच झाला पाहीजे. कमीतकमी तो तरी आपल्या इच्छेनुसार होऊ शकतो. मग जायचं असंच दूर. कधीतरी संपेल शक्ती त्या अथांगतेच्या कवेत आणि आपण स्वत:ही.”
तो सागराच्या काठी आला आणि तेच बोचरे सत्य परत त्याला जाणवले. समुद्रात दूरवर मासेमारीसाठी गेलेल्या नौका त्याला त्या अंधूक संधीप्रकाशात दिसल्या. “मला कोणीही वाचवायला नकोय. कंटाळलोय मी ह्या मानवतेला. वाचवल्यानंतर हाती काय येईल तर तेच आयूष्य ह्याच मानवजातीला घट्टपणे बांधलेलं. साले दावा टाकतील, काय तर म्हणे आत्महत्येचा प्रयत्न. कोण तुम्ही हे ठरवणार, मी काय करावं हे ठरवणारे?” चिडलेल्या अवस्थेतच त्याने जवळच्या दुकानातून एक ब्लेड घेतले आणि आपल्या खिशात टाकले. उरलेसुरले मागे ठेवून येताना, आपल्याला मरणासाठी सुध्दा पैसे लागू शकतात हे त्याच्या लक्षात आले नव्हते. पण कमीत कमी ह्यावेळी नियतीने त्याला मदत केली होती. धुतलेल्या शर्टामध्ये एक दहा रूपयांची नोट खिशाला घट्ट लगटून राहीलेली सहजपणे मिळावी ह्यापेक्षा अधिक भाग्य काय असू शकते ह्याचा त्याला आनंद झाला.
ओहोटी लागलेल्या समुद्राजवळ येतात तो त्यामध्ये झेपावला. कुठलाच प्रतिकार न करता त्याला समूद्र पुढे जाऊ देत होता. आपले वेळेचे गणित बरोबर जमल्याबद्दल त्याने स्वत:लाच शाबासकी दिली. त्याने आपला वेग आता अजून वाढवला. मागे वळुन पाहील्यानंतर अंधारलेल्या वातावरणात गावाने लावलेले दिवे त्याला आपल्या अंतराचा अंदाज घ्यायला मदत करत होते. "अजूनही बरेच अंतर आपण जाऊ शकतो तर. दमायलाही जास्त झालेलं नाही.” असा विचार करत तो पुढे जाऊ लागला. हातापायांच्या प्रत्येक हालचालीच्या जाणिवेबरोबरच त्याचा स्वत:च्या क्षमतेबद्दलचा विश्वास वाढू लागला. अजून थोडे पुढे जाण्यासाठी त्याला त्याचे मन त्याला सांगू लागले.
असे बरेचसे अंतर कापल्यानंतर मात्र त्याला थकव्याची जाणीव झाली. आता ह्या पुढे आपण जाऊ शकत नसल्याचे निश्चितपणे वाटल्यानंतर तो थांबला. मागचा पुढचा विचार न करता त्याने आपला खिसा चाचपत त्यातील ब्लेड काढले आणि आपल्या हाताच्या नसांवर फिरवले. शरीरातील रक्ताचा प्रवाह वाट काढत बाहेर पडत असल्याचे त्याला उगवत्या चंद्राच्या सौम्य प्रकाशात दिसले. समुद्र शांत असला तरीही त्याच्या तनमनाची आंदोलने त्याला प्रथमच तीव्रतेने जाणवली. त्याने एकामागून एक असे ब्लेडचे वार आपल्या शरीरावर केले. त्याच्या शरीरातील रक्त बाहेर पडतानाही त्याचीच उर्जा वापरत होते. त्या उर्जेवर आता त्याचे नियंत्रण राहीले नव्हते. त्याच्या रक्ताच्या आकर्षणाने आलेल्या माश्यांच्या झुंडी त्याच्या शरीराचा लचका तोडू लागल्या होत्या. त्याचे स्वत:वरचे नियंत्रण सुटले होते. आता तो त्याच्या स्वत:च्या हातापायांच्या जोरावर नव्हे तर माश्यांच्या झटक्यानुसार तो आता हलत होता. त्याच्या नजरेसमोर एकदम किनारा येऊन गेला. गावांचे दिवे आता दिसत नव्हते. होता त्यांचाही फक्त अंधूक संधीप्रकाश.
त्याच्या आयुष्याचा शेवटचा क्षण त्याने ठरवल्याप्रमाणे होऊनही त्याला समाधान देऊ शकत नव्हता कारण ह्या क्षणी त्याला आणि त्याच्या रक्तप्रवाहाला हलवणा-या त्याच्यामध्येच असलेल्या उर्जेचे ज्ञान झाले होते पण आता फार उशीर झाला होता.