Tuesday, August 26, 2008

टप्पा

आमच्या आयुष्यात टप्पा कधी आलाच नाही


वाट नेमून दिली होती


आधीच कोणीतरी


त्यावर चालत गेलो


जमेल तसे कसेतरी


आमच्याकडेही हवे म्हणुन आम्ही शीतकपाट घेतले


त्यात ठेवता येते म्हणुन अन्न जास्त शिजवत गेलो


ास्त झालेल उरले म्हणुन परत त्यात ढकलू लागलो


मोकळे बघवत नाहीत म्हणुन भरून काढले कपाटांनी कोपरे


खन मोकळे सोडू नयेत म्हणुन सामानान्नी भरली कपाटे


आता अशा कपाटान्शी आम्ही रोज थबकतो


काय खावे काय घालावे ह्याचा विचार करत बसतो


साठवत जातो कचरा घरात, शरीरात आणि मनातही,


भाम्बावणा-या प्रश्नांना मिळत नाही उत्तरे.


कन्टाळून टीव्ही समोर बसतो.


"नवीन वर्ष आले" टीव्ही ओरडतो


एकतीस डिसेंबरच्या रात्री फुटकळ विनोदावर हसतो,


काटा येताच बारावर हैप्पी न्यू इयर म्हणतो


झोपायला मोकळे होतो.


दिवस असतो उद्याचा चिंब घामट शरीराचा,


चालत्या लोकलमध्ये मारलेल्या सराईत उडीचा


असेच जाईल का हे ही वर्ष कुठल्याच टप्प्याशिवाय


टप्प्यानन्तर येणा-या उंच उसळीशिवाय


मी नाही चेंडू कुणीतरी फेकलेला


टप्पा तर माझ्याच हाती असलेला


मग थांबावे क्षणभर, अंदाज घ्यावा रस्त्यांचा


जपून ठेवलेली स्वप्ने, सत्यात उतरवण्याचा


जोखावी आपली क्षमता, मानसिक आणि आर्थिक


सोडू नयेत,


असू द्यावेत बरोबर,


जोडीदार आणि साथीदार


आखाव्या नव्या योजना


चोखाळावे चांगले रस्ते


स्वप्नांच्या सत्य स्वरुपासाठी !!!Sunday, August 24, 2008

योजना

थांबावे थोडे...
असतो आपण सर्वचजण
अनंताचे प्रवासी
तरीही लागते पाहावे नेहमी
वाट जाते कुठेशी

थांबावे थोडे...
असतात वाटा सगळीकडे
सगळीकडून येणा-या
जसे मनी येईल तसे
सहज घेऊन जाणा-या

थांबावे थोडे...
करावा लागतो नेहमी विचार
कुठली आपली दिशा ठरवून
निवडावी लागते तशीच वाट
विचार आपला भक्कम करून

थांबावे थोडे...
मोजून घ्यावी आपली क्षमता
कुठवर जाऊ शकतो आपण
त्याही पुढे असेल जायचे
तर मग काय करावे आपण

थांबावे थोडे...
आपण आलो जरी एकटे
एकटेच संपणार तरीही
साथीदार ते प्रवासातले
विसर नसावा त्यांचा कधीही

थांबावे थोडे...
आखावी परिपूर्ण योजना
विचार करूनी साकल्याने
टाकावे मग निश्चीत पाऊल
स्वतःवरच्या त्या विश्वासाने